संत बाळूमामा मंदिरासाठी आमदार राहुल कुल यांच्याकडून सभा मंडपास दहा लाखांची मंजुरी..!
🔥MK NEWS36
रावणगाव | प्रतिनिधी
रावणगाव येथील संत बाळूमामा मंदिराच्या सभा मंडप उभारणीसाठी आमदार राहुल कुल यांच्या निधीतून दहा लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपाचे कार्यकर्ते अरुण आटोळे यांनी दिली. या निर्णयामुळे परिसरात समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक भाविकांनी आमदार कुल यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
मंदिर परिसरातील सभा मंडपाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. संत बाळूमामांच्या दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी येथे दररोज भाविकांची मोठी गर्दी होत असते. विशेषतः अमावस्येच्या दिवशी कीर्तन, प्रवचन आणि बाळूमामांच्या जीवनावरील चरित्र कथन ऐकण्यासाठी महिलांसह मोठ्या संख्येने भाविक येथे जमतात.
किर्तनानंतर भाविकांसाठी आंबील व जेवणाची व्यवस्था स्थानिक भक्त स्वतःहून करीत असतात. दरवर्षी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सत्त्यात विविध कीर्तने, प्रवचने आणि सामूहिक भोजन व्यवस्था केली जाते. वाडेवस्तीतील सर्व भाविक मिळून वर्गणी गोळा करून हा भंडारा मोठ्या उत्साहात पार पाडतात.
सभा मंडपाच्या मंजुरीमुळे आगामी धार्मिक कार्यक्रमांना अधिक सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश मिळाले आहे.




