“निरवांगी आरोग्य केंद्रात डॉक्टर बेपत्ता; रुग्ण ताटकळत, प्रशासन झोपेत?”
🔥MK NEWS36
इंदापूर | प्रतिनिधी – सागर समिंदर
निरवांगी आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा मनमानी कारभार; तक्रारींनंतरही प्रशासन गप्प!
इंदापूर तालुक्यातील निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर ओमकार कृष्णा ताटे (ओमकार हेंद्रे) हे 24×7 सेवेसाठी नियुक्त असतानाही एकाही दिवशी वेळेचे पालन करत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सकाळी ९ वाजल्यापासून वृद्ध व रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेले असताना संबंधित डॉक्टर मात्र सकाळी १० वाजेपर्यंतही हजर नसल्याचे चित्र ४ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. “डॉक्टर कधी येतील?” असा सवाल विचारल्यावर केंद्रातील कर्मचाऱ्यांकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने रुग्णांच्या संतापाचा बांध फुटत आहे.

यापूर्वीच या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार अधिकच बळावल्याचे दिसत आहे.
दरम्यान, ४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते श्रीमंत ढोले तसेच पंचायत समिती सदस्य बापूसाहेब शेंडे यांनी केंद्रात बैठक घेऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांना वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशालाही केराची टोपली दाखवत संबंधित डॉक्टरांनी आपला मनमानी पवित्रा कायम ठेवल्याने प्रशासनाच्या अधिकारालाच खुलेआम आव्हान दिल्याचे चित्र आहे.
“आरोग्य केंद्र की खाजगी दवाखाना?” असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत असून, “२४ तास सेवा” ही केवळ कागदोपत्रीच राहिली आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
निरवांगीसारख्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा ही जीवित-मृत्यूचा प्रश्न असताना अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना तीव्र होत आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर लगाम लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.




