“निरवांगी शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; एकाच शिक्षकावर चार वर्गांचा भार”
🔥MK NEWS36
निरवांगीत शाळेची दयनीय अवस्था; एकाच शिक्षकावर चार वर्गांचा भार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…!
सागर समिंदर प्रतिनिधी इंदापूर
निरवांगी (प्रतिनिधी) – निमसाखर केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निरवांगी येथे शिक्षण व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण ४१ विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या या शाळेत गेल्या चार महिन्यांपासून केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे.
दुसऱ्या शिक्षकाची बदली झाल्यानंतर अद्याप नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, एकाच शिक्षकावर सर्व चार वर्गांचा शैक्षणिक भार पडत असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे कठीण झाले असून शिक्षकांवर ताण वाढला आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि बौद्धिक विकासावर होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, शाळेच्या इमारतीची स्थितीही अत्यंत धोकादायक बनली आहे. शाळेच्या भिंती कोसळलेल्या असून छतावरील पत्रे लटकत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे ही पत्रे उडून अपघात होण्याची भीती आहे. तसेच, पडलेल्या भिंतींमुळे परिसरात दगडांचा ढिगारा तयार झाला असून त्यामध्ये साप व इतर विषारी प्राण्यांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी ४ एप्रिल २०२६ रोजी निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कर्मचाऱ्यांना वेळेचे पालन करण्याचे आदेश दिले. मात्र, शाळेतील या गंभीर समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सुरक्षिततेबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे.
शासनाच्या नियमानुसार अशा परिस्थितीत तातडीने शिक्षकांची नियुक्ती करणे आणि शाळेची दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून शाळेस शिक्षक उपलब्ध करून देणे तसेच इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या काळात गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




