“बारामतीत पाऊस झाला की रोड की तलाव? जाणून घ्या धक्कादायक वास्तव”
🔥MK NEWS 36 संपादकीय
बारामतीत विकासाच्या नावाखाली फक्त सजावट? – पावसाने उघड केला रस्त्यांचा खो!
बारामती – शुक्रवारी झालेल्या पावसाने बारामती शहरातील विकासकामांचा बुरखा पूर्णपणे फाडून काढला आहे. पाटस रोडवरील शाहू हायस्कूल परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला की गाड्या अक्षरशः पाण्यात बंद पडल्या. गुडघाभर पाणी रस्त्यावर उभं राहिल्याने वाहनधारकांसमोर प्रचंड अडचण निर्माण झाली. शाळा परिसर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आला आहे.

देशमुख चौक ते महात्मा फुले चौक रिंग रोड..
महात्मा फुले चौक ते देशमुख चौक या मधल्या रस्त्यांची अवस्था सुद्धा अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ते तुटलेले, खड्ड्यांनी भरलेले आणि त्यावर पावसाचे साचलेले पाणी म्हणजे अक्षरशः अपघाताचे आमंत्रणच आहे. नागरिकांचा सवाल अगदी थेट आहे – “बारामती म्हटलं की फक्त बिल्डिंग, शोभेचे स्टॉल, सजावट यालाच महत्त्व? मूलभूत सोयीसुविधा, पाणी निचरा, रस्त्यांची दुरुस्ती या गोष्टींकडे कुणी लक्ष देणार नाही का?”

शाहू हायस्कूल शेजारी साठलेले पाणी
नव्याने सुरू असलेल्या अरुंदर रोडमुळे वाहतुकीची कोंडी आणखी वाढत आहे. अशा परिस्थितीत पाटस रोडसारखा महत्त्वाचा रस्ता दर पावसात जलाशय होऊन बसतो, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शाळा परिसरात एखादा अपघात घडला तर जबाबदार कोण, असा ज्वलंत प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बारामतीत विकासाचा चेहरा फक्त बाहेरून दिसतो आहे – मोठमोठ्या इमारती, रस्त्याच्या कडेने शोभेच्या सजावटी, स्टॉल्स आणि फोटो काढण्याजोगे पॉईंट्स. पण खरी परिस्थिती अशी की साधा पावसाळा पेलण्याची ताकद या रस्त्यांना नाही. एवढ्या मोठ्या निधी खर्च करूनही जर पाण्याचा निचरा नीट होत नसेल, तर हा कसला विकास असा सवाल जनतेच्या मनात पेट घेत आहे?




