ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

हिवताप प्रतिबंधासाठी पाटस उपकेंद्राचा पुढाकार, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


🔥MK NEWS36 

जागतिक हिवताप दिनानिमित्त पाटस उपकेंद्रात जनजागृतीची प्रभात फेरी

दौंड, दि. 25 एप्रिल 2026 – जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधत दौंड तालुका आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वरवंड अंतर्गत पाटस उपकेंद्र येथे विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक भजनाने करण्यात आली. त्यानंतर आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीद्वारे गावात हिवताप (मलेरिया) प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. “डासमुक्त परिसर, हिवतापमुक्त गाव” असा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले.

यावेळी आरोग्य दिंडी, गवळण आणि भारुड यांसारख्या सांस्कृतिक सादरीकरणातून आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, मच्छरदाणीचा वापर करणे, तसेच पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरभेटी देत तापग्रस्त रुग्णांची तपासणी केली व आवश्यकतेनुसार रक्त नमुने गोळा केले. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा वर्कर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दौंड तालुका आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि हिवताप प्रतिबंधासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.


Translate »
error: Content is protected !!