कटफळ केमिकल रेड फसवी? एक पंचाची सही खोटी, दुसरा पंच घटनास्थळीच नव्हता?
🔥MK NEWS36
सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांचा फॅक्टरीला अभय? अजित पवारांच्या ‘देशातील बारामती’वर प्रश्नचिन्ह..!
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती |
बारामती तालुक्यातील कटफळ येथील केमिकल फॅक्टरी रेड प्रकरण दिवसेंदिवस अधिकच संशयाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. एकामागून एक धक्कादायक, नियमबाह्य आणि गंभीर प्रकार उघडकीस येत असतानाही रेड करणारे संबंधित अधिकारी मात्र अजूनही जैसे थे भूमिकेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “नेमकं झाकलं जातंय तरी काय?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे पंचनाम्याची विश्वासार्हताच संशयात आली आहे. उपलब्ध पुराव्यानुसार पंचनाम्यावर असलेली एका पंचाची सही ही १०० टक्के खोटी असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. एवढेच नव्हे तर 16 डिसेंबर रोजी रात्री 12:15 वाजता करण्यात आलेल्या रेडवेळी दुसरा पंच प्रत्यक्षात घटनास्थळी उपस्थितच नव्हता. तरीही पंचनाम्यात मात्र “दोन्ही पंचांना सोबत घेऊन रेड करण्यात आली” असा ठाम उल्लेख आहे.
खरी परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. संबंधित दुसरा पंच हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 डिसेंबर रोजी थेट दुपारी 1:30 वाजता हजर झाला, आणि तरीही त्याची सही पंचनाम्यावर आहे. म्हणजेच, रेडवेळी अनुपस्थित असलेला पंच नंतर येऊन अधिकृत पंचनाम्यावर सही करतो, हा प्रकार सरळसरळ कायद्याची, प्रक्रियेची आणि लोकशाहीची थट्टा करणारा नाही तर काय?
इतकी मोठी तफावत, इतका उघड नियमभंग समोर येऊनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. याच फॅक्टरीत अत्यंत घातक केमिकल्सचा वापर होत असल्याचे गंभीर आरोप असताना, आजवर ना उत्पादनावर बंदी, ना गुन्हा दाखल, ना कारवाई — हे सारे पाहता संशय अधिकच बळावतो.
या फॅक्टरीतून तयार होणारे केमिकल्स महाराष्ट्रभरातील साखर कारखान्यांना पुरवले जात असल्याची चर्चा आहे. म्हणजेच हा प्रश्न केवळ कटफळ किंवा बारामतीपुरता मर्यादित नसून, लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी थेट संबंधित आहे. तरीही प्रशासनाचा ढिसाळपणा आणि मौन नागरिकांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे.
या साऱ्या प्रकारामागे राजकीय आशीर्वाद आहे का? हा प्रश्न आता खुलेपणाने विचारला जात आहे. कारण संबंधित फॅक्टरीचा संबंध सत्ताधारी गटाच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पती व कार्यकर्त्याशी असल्याची चर्चा दबक्या आवाजात नव्हे, तर उघडपणे सुरू आहे. त्यामुळेच “अजित पवारांचे निकटवर्तीय असल्यामुळेच कारवाई होत नाही ना?” असा थेट आरोप नागरिक करत आहेत.
एकीकडे अजित पवार जाहीरपणे सांगतात की, “बारामती महाराष्ट्रात नाही, देशात आहे”, पण प्रत्यक्षात मात्र बारामतीतील लोकांच्या जीवाशी खेळ चालू असताना प्रशासन आणि यंत्रणा गप्प का? हा सवाल अनुत्तरित आहे.
हे प्रकरण केवळ एका रेडपुरते मर्यादित नाही, तर बनावट पंचनामा, नियमबाह्य कारवाई, घातक केमिकल्सचा वापर आणि संभाव्य राजकीय हस्तक्षेप अशा अनेक गंभीर मुद्द्यांचा संगम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संपूर्ण प्रकरणाचा सखोल, पुराव्यानिशी पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार, असा इशारा देण्यात येत आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे.
सत्य बाहेर येणारच आहे.
वाचत रहा – MK NEWS36
बातमी सविस्तर… तिखट… आणि थेट सवाल करणारी.




