क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

पुण्यात गँगवॉरचा थरार! आयुष कोमकरचा खून; बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा


🔥MK NEWS 36

प्रतिनिधी 

पुण्यात गँगवॉर! आयुष कोमकरचा खून; आंदेकर टोळीच्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा

पुणे :
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने प्रतिस्पर्धी गटातील तरुणावर गोळीबार केला. या हल्ल्यात गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय १८, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, नाना पेठ) याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास नाना पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल

या खुनाच्या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन उर्फ खान, यश पाटील अशा एकूण 11 जणांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी दिली.

घटनेचा तपशील

शुक्रवारी रात्री आयुष कोमकर आपल्या दुचाकीवरून सोसायटीत आला असताना आरोपी अमन खान आणि यश पाटील हे सोसायटीतच दबा धरून बसले होते. त्याच्यावर पिस्तुलातून 11 गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील तीन गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला व घटनास्थळीच मृत्यू झाला. हा खून आंदेकर टोळीचे म्होरक्या बंडू आंदेकर आणि अन्य आरोपींनी रचलेल्या कटाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पार्श्वभूमी : वनराज आंदेकरचा खून

मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी नाना पेठेतच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून करण्यात आला होता. गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हा खून झाला होता. या खुनामध्ये सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते यांच्यासह आंदेकरांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती जयंत कोमकर, दीर गणेश कोमकर यांसह १६ आरोपींना अटक झाली होती.

पोलिसांच्या तपासात कौटुंबिक वाद, संपत्ती आणि वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकरचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. आंदेकरच्या सांगण्यावरून महापालिकेने दुकानावर केलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे कोमकर गटाने खुनाचा कट रचल्याचे समोर आले होते.

बदला आणि वाढता गँगवॉर

वनराज आंदेकर खुनातील आरोप ठरलेले कोमकर गट आणि आंदेकर टोळी यांच्यातील वैर अधिकच तीव्र झाले. त्याचा बदला म्हणून आयुष कोमकरचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. सलग हत्याकांडांमुळे नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण असून पुण्यात गँगवॉरचे सावट पुन्हा गडद झाले आहे.


Translate »
error: Content is protected !!