बारामती तालुका : दत्त मंदिरासमोर रक्तरंजित हल्ला; सात आरोपींवर गुन्हा दाखल..!
🔥MK NEWS 36 संपादकीय
वंजारवाडीत जुन्या भांडणातून कोयत्याने हल्ला; पाच जण जखमी, सात जणांविरोधात गुन्हा दाखल..!
बारामती तालुका :
बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे घटस्थापनेच्या दिवशी रात्री जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास दत्त मंदिरासमोर घडली.
याप्रकरणी फिर्यादी अमोल अण्णा चौधरी यांच्या तक्रारीवरून ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जन कुचेकर, अली मुजावर, दिपक भोलनकर, शुभम वाघ आणि तेजस हजारे यांच्यासह सात जणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्यात सुनिल गोरख चौधरी, अमोल अण्णा चौधरी, भारत गोकुळ चौधरी, सागर चंद्रकांत चौधरी आणि आदित्य सर्जेराव चौधरी हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादीने पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवानिमित्त देवीची ज्योत राशीन येथून वंजारवाडी येथे आणून दत्त मंदिरासमोर पूजा पार पाडली जात होती. त्याचवेळी एक चारचाकी गाडी घटनास्थळी आली. त्यातून ऋतिक मुळिक व इतर आरोपी लोखंडी कोयते व चाकूंसह उतरले आणि त्यांनी फिर्यादी व त्यांच्या भावांवर हल्ला चढवला.
या घटनेनंतर शुभम वाघ, अली मुजावर आणि ओम अर्जन कुचेकर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पुढील तपास करत आहेत.




