ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

नागरिकांचा सवाल : विरोध कुठे आहे? सत्तेला कोणी विचारणार हिशोब!


🔥MK NEWS 36 

बारामती नगरपालिकेचे बिगुल वाजले — पण खरी लढत अजून बाकी!

संपादकीय : प्रदीप गायकवाड, बारामती
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकारणाला आता खरी रंगत आली आहे. मात्र या निवडणुकीत “विरोधक कोण?” हा प्रश्न पुन्हा एकदा नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. कारण बारामतीच्या नगरपरिषदेच्या इतिहासात आजवर खऱ्या अर्थाने “कडवट आणि ठाम विरोधक” पाहायला मिळाले नाहीत — किंवा असे विरोधक उभे राहूच दिले नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

बारामतीचे राजकारण हे जणू “तू कर मारल्यावाणी मी  करतो रडल्या वाणी” अशा सौम्य विरोधावरच चालले आहे. विरोधकांच्या बाकावर बसणाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना खऱ्या अर्थाने विरोध न करता, फक्त स्वतःचा राजकीय खिसा गरम करण्याचं राजकारण केल्याचं चित्र लोकांना दिसते. “विरोध हा सत्तेला उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा असावा,” अशी नागरिकांची भावना असतानाही बारामतीत विरोध फक्त औपचारिक स्वरूपातच दिसतो.

नगरपरिषदेचा सध्याचा कारभार मनमानी पद्धतीने चालत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत. सीईओपासून प्रशासनातील प्रमुख अधिकारी फक्त नेत्यांचं ऐकतात, नागरिकांची कामं दुर्लक्षित राहतात, आणि ठराविक मोजक्या लोकांनाच सन्मान दिला जातो. सर्वसामान्यांना मात्र “बाहेरचा रस्ता” दाखवण्याची पद्धत रुळल्याची चर्चा आहे.
यासाठी विरोधकही काही अंशी जबाबदार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. कारण जिथे खरी लढत उभी राहू शकते तिथे हेच विरोधक माघार घेतात, किंवा सत्ताधाऱ्यांसाठीच “उमेदवारी” उभी करतात. “निवडणुकीत भाग घेणं म्हणजे जनतेच्या आवाजासाठी लढणं, पण बारामतीत काहीजण सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी लढतात,” असा आरोप विरोधी गटातही ऐकू येतो.

आता मात्र नागरिकांनी “एकहाती सत्ता” देण्याचा अनुभव घेतला असून, सत्ता परिवर्तनाची हाक उमटताना दिसते. नागरिकांच्या अपेक्षा आहेत की या वेळी खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष उभा राहावा, जो प्रश्न विचारेल, उत्तर मागेल आणि सत्तेला जबाबदार ठेवे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गट कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसवरचं वर्चस्व कायम राहणार का, की काही स्वतंत्र विचारांचे कार्यकर्ते नवा पर्याय देतील, हा प्रश्न आता चर्चेत आहे. “हम सब एक है” की “बदलाचं वारे बारामतीतही येणार?” या प्रश्नाचे उत्तर मतदारच ठरवतील.

एकूणच, बारामती नगरपालिकेच्या बिगुलानंतर आता खरी लढत “सत्ता विरुद्ध जनता” अशी होणार की पुन्हा एकहाती सत्ता, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.


Translate »
error: Content is protected !!