ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

संशयितांची चौकशी नाही, PM रिपोर्टही गुलदस्त्यात : वरवंड प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय?


🔥MK NEWS36 

वरवंड येथील दलित तरुणीच्या मृत्यूने खळबळ : न्याय मिळेल की अन्याय दडपला जाईल? नागरिकांचा थेट सवाल..!

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

वरवंड (ता. दौंड) येथे एका दलित कुटुंबातील होतकरू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना एक महिना उलटूनही अजूनही धूसरच आहे. ही आत्महत्या होती की आत्महत्येस प्रवृत्त केलेली हत्या, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकत चालली असून “न्याय देणारेच जर अन्याय करत असतील, तर न्याय मागायचा तरी कोणाकडे?” असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

या तरुणीने फाशी घेण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण काय, कोण जबाबदार आहे, याचा शोध घेण्याची मानसिकताच प्रशासनाकडे दिसत नसल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. एक महिना उलटूनही या प्रकरणात ठोस प्रगती का नाही, याचे उत्तर देण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात संशयित असलेल्या संबंधित युवकाला आजतागायत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्या युवकामध्ये दिसणारा निर्भीडपणा प्रशासनानेच दिलेला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कायद्याची भीतीच संपली आहे का? हा प्रश्न आता केवळ कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण तालुका विचारत आहे.

नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे की संबंधित युवकाचा मोबाईल जप्त करण्यात आला का? असून कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) काढल्यास मृत तरुणी व त्या युवकामध्ये वारंवार संपर्क असल्याचे स्पष्ट होईल. मात्र पोलीस प्रशासन याबाबत स्पष्ट भूमिका घेत नसून “मोबाईल जप्त केलेला नाही” असे सांगत आहे. मग जर मोबाईल जप्तच केला नसेल, तर चौकशी का नाही? आणि जर काहीही दोष नाही, तर चौकशीला बोलावण्यास काय हरकत आहे? असे थेट प्रश्न उपस्थित होत आहेत.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एक महिना उलटूनही या तरुणीचा पोस्टमॉर्टेम अहवाल (PM Report) अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. केवळ नागरिकच नव्हे, तर मृत तरुणीच्या आई-वडिलांनाही, नातेवाईकांनाही मृत्यूचे नेमके कारण माहिती नाही. हा विलंब कोणासाठी? कोणाला वाचवण्यासाठी? की आर्थिक व्यवहारांमुळे प्रशासन मुद्दाम शांत बसले आहे? असे गंभीर आरोप आणि संशय नागरिकांमध्ये खुलेआम व्यक्त होत आहेत.

या तरुणीचा मृत्यू दलित कुटुंबातील असल्यामुळेच प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे का? प्रशासनाने याचा गैरफायदा घेतला आहे का? असे प्रश्न अधिक तीव्र होत चालले आहेत. संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले असून, “न्याय होणार की नाही?” याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

आता नागरिकांची अपेक्षा आहे की या प्रकरणात स्वतः पोलीस निरीक्षक (PI) यांनी लक्ष घालून निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान तपास करावा. दोषी कोणीही असो, त्याला तात्काळ चौकशीसाठी बोलावून कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यात यावी. अन्यथा प्रशासनाच्या भूमिकेवर जनतेचा विश्वास उरणार नाही, असा इशारा नागरिक देत आहेत.

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले आई-वडील, संतप्त नातेवाईक आणि अस्वस्थ नागरिक — वरवंडच्या या तरुणीला खरंच न्याय मिळणार का? की हा मृत्यू फक्त कागदोपत्री “आत्महत्या” ठरवून प्रकरण गाडले जाणार? हा प्रश्न आता संपूर्ण तालुक्याला भेडसावत आहे.


Translate »
error: Content is protected !!