केडगावात बैलपोळा सण उत्साहात; डी.जे.च्या तालावर सजवलेल्या बैलांची ठसकेदार मिरवणूक..!
🔥MK NEWS 36
🎉 केडगाव परिसरात डी.जे.च्या तालावर ठसकेदार बैलपोळा उत्सव
विनोद शेलार,
प्रतिनिधी – केडगाव (ता. दौंड)
केडगाव परिसरात बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक ढोल-ताशांसह यंदा डी.जे.च्या तालावर सजवलेल्या बैलांची ठसकेदार मिरवणूक काढण्यात आली.
“जिवाशिवाची बैलजोड लावील पैजंला आपली कुडं” तसेच “डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा, ये गा रामाच्या बानाचा” अशी मराठमोळी गीते वाजताच परिसरात उत्साहाचे वातावरण अधिकच रंगले.

बैलपोळ्यानिमित्त सर्व शेतकरी वर्गाने सकाळपासूनच आपल्या बळीराजाच्या साथीदार असलेल्या बैलांची देखभाल, स्नान व सुंदर सजावट केली. हार-फुले, रंगीबेरंगी कपडे व पारंपरिक गजरांनी सजलेले बैल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी ज्यांच्याकडे गुरेढोरे नाहीत त्यांनी परंपरा जपत बाजारातून मातीची बैलजोड विकत घेऊन त्याची पूजा केली. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकतेचा संगम दिसून आला.
तरुण वर्गाने बैलपोळा सण मनावर घेत विविध उपक्रम व मिरवणुकीला चांगला प्रतिसाद दिला. सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने हा पारंपरिक सण आनंद, उत्साह आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला.




