नवरात्रीत फिरंगाई मंदिर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट? ग्रामस्थांची कडक बंदोबस्ताची मागणी..!
🔥MK NEWS 36
✒️ दौंड प्रतिनिधी – कोमल सोनवणे
नवरात्र उत्सवात फिरंगाई मंदिर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट; कडक पोलिस बंदोबस्ताची मागणी..!
कुरकुंभ : श्री फिरंगाई देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली असून सोमवार (दि.२२) पासून हा उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. मात्र, यावेळी मंदिर परिसरात चोरट्यांचा वावर वाढण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थ व मंदिर विश्वस्त मंडळाने पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
नवरात्रातील पाचवी व सातवी माळ या विशेष महत्त्वाच्या असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. गर्दीचा फायदा घेत यापूर्वी अनेक महिलांचे दागिने, पैसे व पाकिटे चोरट्यांनी लंपास केली आहेत. काही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या असल्या तरी चोरटे पोलिसांच्या हाती सापडलेले नाहीत.
भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे यासाठी यंदा पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना कराव्यात, जादा बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी होत आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून स्थानिक नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
👉 भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी सतर्क राहून चोरट्यांवर अंकुश आणावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केली आहे.




