ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कार्यकर्त्यांचा सवाल: झेंडा आम्ही उचलतो, पण उमेदवारी श्रीमंतांना का?


🔥MK NEWS36 

🗳️ बारामती नगरपरिषद निवडणूक: “तिकीट” पैशाच्या बळावर की कार्यकर्त्यांच्या कामावर?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

बारामती – जशी-जशी नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागतेय, तशी शहरात आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याची लाट उसळली आहे. गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पण या चर्चेत एक प्रश्न सातत्याने नागरिकांच्या ओठावर आहे — “या वेळेस तिकीट सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळणार का? की पुन्हा एकदा पैसा आणि प्रतिष्ठेचा खेळ रंगणार?”

गेल्या अनेक निवडणुकांचा अनुभव सांगतो, की बारामतीसह राज्यातील अनेक नगरपरिषद निवडणुकांमध्ये “पैसा” हा घटक सर्वात प्रभावी ठरतो. ज्याच्याकडे खर्च करण्याची ताकद, प्रचारासाठी साधनं आणि बाह्य झगमगाट आहे, त्यालाच उमेदवारी मिळते. सामाजिक कार्य, सामान्य माणसांशी संपर्क, तळागाळातील योगदान या गोष्टी मागे पडतात.

अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे की, “तिकीट फक्त ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मिळते, आणि निवडणूक संपली की पाच वर्ष तो कार्यकर्ता दिसतही नाही.” दुसरीकडे, अनेक कट्टर, एकनिष्ठ कार्यकर्ते, जे वर्षानुवर्ष पक्षाचा झेंडा उचलून समाजासाठी काम करत आहेत, त्यांना मात्र संधीपासून वंचित राहावे लागते.

आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक प्रभागात काही इच्छुक स्वतःला “भावी नगरसेवक” समजून गल्लीबोळात फोटोसेशन करताना दिसतात. समाजासाठी काम केलेले दाखवण्यासाठी इंस्टाग्राम, फेसबुकवर पोस्ट्स टाकल्या जातात. मात्र नागरिक विचारतात, “सामाजिक काम जर खरं मनापासून केलं असेल, तर त्यासाठी फोटोसेशनची गरज काय?”

नगरसेवक होण्याचा उद्देश सामाजिक बांधिलकीचा असावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. पण आता निवडणूक प्रतिष्ठा, पैसा आणि राजकीय नफा मिळवण्याचं साधन झालं आहे. त्यामुळे सामान्य घरातून आलेल्या, गरीब कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणं हीच मोठी लढाई ठरते.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये सध्या सर्वाधिक इच्छुक उमेदवार असल्यामुळे ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे. एकहाती सत्ता असलेला पक्ष खरोखरच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देईल का? की पुन्हा एकदा श्रीमंत, प्रभावशाली चेहऱ्यांनाच संधी मिळेल?

नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये आता उत्सुकता आहे —
👉 या वेळेस पक्ष सामाजिक कार्याला प्राधान्य देईल का?
👉 तळागाळातील खरा कार्यकर्ता उमेदवार म्हणून पुढे येईल का?
👉 की निवडणूक पुन्हा एकदा पैशाचा आणि प्रतिष्ठेचा खेळ ठरणार?

निवडणुकीचा कल आणि तिकीट वितरण या दोन्ही गोष्टींचा निकाल काही दिवसांतच स्पष्ट होईल. पण बारामतीतील एक मोठा प्रश्न कायम आहे — “कार्यकर्त्यांच्या निष्ठेला न्याय मिळेल का?


Translate »
error: Content is protected !!