दौंड तालुक्यातील गिरीम येथे हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; १२ कामगार भाजले, ६ जणांची प्रकृती गंभीर..!
🔥MK NEWS36
दौंड तालुक्यातील गिरीम येथे हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; १२ कामगार भाजून जखमी, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
दौंड तालुक्यातील मौजे गिरीम गावच्या हद्दीतील पाटस रोडवरील हॉटेल जगदंबा येथे आज बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकगृहामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन १२ कामगार भाजून जखमी झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हॉटेल हे दौंड शहरापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर पश्चिमेकडे स्थित आहे. स्फोटानंतर हॉटेलमध्ये अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच दौंड नगरपालिकेची दोन अग्निशामक वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, त्यांच्या मदतीने आग लवकरच आटोक्यात आणण्यात आली.

अपघातानंतर तातडीने मदतकार्य राबवण्यात आले. जखमी झालेल्या १० कामगारांना १०८ रुग्णवाहिका तसेच खासगी ॲम्ब्युलन्सद्वारे दौंड शहरातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत पिरॅमिड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. या दहा जखमींपैकी ६ जण ७० टक्क्यांपेक्षा अधिक भाजले गेले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे संदर्भित करण्यात आले आहे. या सहा जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. उर्वरित ४ जखमींवर पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याशिवाय २ जखमींना उपजिल्हा रुग्णालय, दौंड येथे दाखल करून पुढील उपचार करण्यात येत आहेत.
जखमींपैकी ११ पुरुष कामगार हे रघुवनसुपरा, ता. यादवनपूर, जि. आग्रा (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून, १ महिला कामगार ही स्थानिक गावची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम बनसोडे, विस्तार अधिकारी श्री. दिलीप जगताप, आरोग्य निरीक्षक श्री. गोपी हंडाळ, श्री. महावीर कांबळे व श्री. नरेंद्र पाटणकर यांनी घटनास्थळासह उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी तातडीचे उपचार, संदर्भ सेवा व आवश्यक वैद्यकीय मदत कार्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
दरम्यान, गॅस सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत तपास सुरू असून, संबंधित यंत्रणांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे.




