भावी वकिलांना न्यायालयीन वातावरणाचा प्रत्यक्ष परिचय..!
🔥MK NEWS 36
विधी विद्यार्थ्यांची लोकन्यायालयाला भेट
बोरीवली (रोशन भोईर) दि. १३
जयवंत हरिश्चंद्र लोखंडे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज बोरीवली न्यायालयातील लोकन्यायालयाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना लोकन्यायालयाची कार्यपद्धती, न्यायप्रक्रिया तसेच न्यायव्यवस्थेतील जलद न्यायनिवाडा प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा होता.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी न्यायालयीन कार्यवाही प्रत्यक्ष पाहिली. तडजोडीतून प्रकरणे कशी निकाली काढली जातात, त्याचा न्यायालयावर होणारा ताण कसा कमी होतो, तसेच लोकन्यायालयाचे सर्वांगीण महत्त्व याबाबत न्यायालयीन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना न्यायालयीन वातावरणाचा प्रत्यक्ष परिचय झाला. भावी वकील म्हणून ही शैक्षणिक भेट त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे विद्यार्थीवर्गाने सांगितले.

या भेटीसाठी महाविद्यालयाचे प्रमुख श्री. आशिर्वाद लोखंडे सर, श्री. सचिन सर, प्राचार्य श्री. आशिष सर, श्री. अमीत सर, विभागीय प्रमुख प्रा. रामेश्वरी मॅडम, प्रा. अनिता मॅडम आणि प्रा. फुलराणी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या आयोजनामध्ये आकाश जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी द्वितीय वर्षातील विद्यार्थी मॉरिस सर यांनी न्यायालयीन कार्यवाही पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.




