अधिकार नसताना केमिकल कंपनीवर रेड? एक्साईज अधिकाऱ्यांची कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात?
🔥MK NEWS36
केमिकल कंपनी रेड प्रकरण : अधिकार नसताना रेड, पंचनामा संशयाच्या चौकटीत? अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती|
बारामती तालुक्यातील केमिकल कंपनीवरील कथित रेड प्रकरणात दिवसेंदिवस एकामागून एक धक्कादायक व गंभीर मुद्दे समोर येत असून, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समोर आलेल्या बाबी पाहता, या संपूर्ण प्रकरणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले का?आल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
🔴मुद्दा क्रमांक १ : अधिकार नसताना रेड का?
जर एक्साईज विभागाच्या अधिकारक्षेत्रात सदर केमिकल येत नसेल, तर संबंधित विभागाशी तात्काळ संपर्क करून ही रेड त्या विभागाकडे सुपूर्त का करण्यात आली नाही? अधिकार नसतानाही कारवाई सुरू ठेवण्यामागे नेमका उद्देश काय होता, हा मोठा प्रश्न आहे.
🔴मुद्दा क्रमांक २ : पंचनाम्यात स्पष्ट उल्लेख का नाही?
जर हे प्रकरण आपल्या अधिकारात नव्हते, तर पंचनामा करताना त्याचा स्पष्ट उल्लेख का करण्यात आला नाही? पंचनाम्यातील अपूर्ण व दिशाभूल करणारी नोंद संशय अधिक गडद करत आहे.
🔴मुद्दा क्रमांक ३ : रात्रीची रेड, दिवसा पंचनामा – विसंगती का?
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण अल्कोहोलशी संबंधित नव्हते, तर मग रात्री पंचनामा न करता दिवसा पंचनामा का करण्यात आला? या वेळेतील तफावत कोणाला वाचवण्यासाठी होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
🔴मुद्दा क्रमांक ४ : पंच हजर नसतानाही हजर असल्याचा उल्लेख?
रेडदरम्यान पंच प्रत्यक्षात सोबत नसताना, पंचनाम्यात ‘पंच हजर होते’ असा उल्लेख कसा करण्यात आला? एका पंचाची सही खोटी आणि दुसऱ्या पंचाला नंतर केवळ सहीसाठी बोलावल्याचे आरोपही पुढे येत आहेत.
🔴मुद्दा क्रमांक ५ : 112 कॉल असूनही पोलीस गाडी माघारी का?
112 वरून कॉल झाल्याचे सांगितले जात असताना, पोलीस विभागाची गाडी घटनास्थळी न जाता अर्ध्यातूनच माघारी का फिरली? यामागे कोणाचा दबाव होता का, याची चौकशी होणार का?
🔴मुद्दा क्रमांक ६ : राजकीय हस्तक्षेप व ‘स्लीपिंग पार्टनर’चा संशय?
या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप किंवा स्लीपिंग पार्टनर असल्याची चर्चा जोर धरत आहे. विशेषतः हा विषय साखर कारखान्याशी निगडित असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, या कोनातूनही तपास होणे गरजेचे आहे.
आरोग्याला घातक केमिकल असूनही पाणी मिसळणे – सर्वांच्या समोर?
रेडदरम्यान सापडलेल्या केमिकलमध्ये अधिकाऱ्यांच्या समोरच पाणी मिसळण्यात आल्याचे समोर आले आहे का? जर हे केमिकल मानवी आरोग्यासाठी धोकादायक नसेल, तर हे सर्व लपूनछपून आणि रात्रीच्या अंधारात का केले जात होते?
परवाने, लायसन्स आणि सप्लायर्सची चौकशी का नाही?
बारामती परिसरात केमिकल फॅक्टरीसाठी एमआयडीसीतही स्पष्ट परवानगी नसताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकल तिथे कसे आले? त्या केमिकलचे परचेस ऑर्डर, सप्लायर्सचे लायसन्स, वाहतूक परवाने यांची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची नव्हती का?
घाईघाईत ‘क्लीन चिट’ का?
“अल्कोहोलशी संबंधित काहीच सापडले नाही” असे सांगत कंपनी मालकाला घाईघाईत क्लीन चिट देण्यामागे नेमकी घाई कशासाठी होती? नगरसेवक पदाच्या तिकिटासाठी ही घाई होती का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
अधिकारी गप्प – गुन्हा नोंद का होऊ नये?
एवढ्या गंभीर बाबी समोर येऊनही अधिकारी वर्ग जर गप्प असेल, तर त्यांच्यावर गुन्हा नोंद का होऊ नये, हा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
MK NEWS36 चा इशारा..!
या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, यासाठी येणाऱ्या काळात संबंधित अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे ठोस पाठपुरावा केला जाणार आहे.
वाचत रहा, विचारत रहा… अन्याय हा अन्यायच असतो, गप्प बसू नका!
या प्रकरणातील प्रत्येक मुद्दा उघड होईपर्यंत MK NEWS36 पाठपुरावा करत राहणार आहे.




