बारामती पोलिसांची वाहतूक नियमभंगावर कारवाई; चोरीची मोटारसायकल जप्त..!
🔥MK NEWS36
मोतीबाग चौकात विशेष नाकाबंदी : 39 वाहनचालकांवर कारवाई; 30 हजारांचा दंड वसूल..!
बारामती : बारामती शहर वाहतूक शाखा व बारामती शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि. 10 मार्च) रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत मोतीबाग चौक येथे विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 39 प्रकरणे नोंदवून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या विशेष नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वाहनांची सखोल तपासणी केली. यामध्ये पोलीस इशारा न मानणे या कारणावरून 3, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणे 9, ट्रिपल सीट 6, काळी काच असलेली वाहने 2, रेड रिफ्लेक्टर नसणे 5, नंबर प्लेट संदर्भातील नियमभंग 8, PUCC प्रमाणपत्र नसणे 1 तसेच इतर 5 अशा एकूण 39 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलिसांना विशेष यशही मिळाले असून चोरीस गेलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एका वाहनचालकावर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (पुणे ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश माने व बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस व होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला.
या कारवाईत वाहतूक पोलीस अंमलदार प्रदीप काळे, अमोल मदने, अजिंक्य कदम, आकाश कांबळे, पांडुरंग सापते, उत्तम खाडे तसेच महिला पोलीस अंमलदार स्वाती काजळे, आशा शिरतोडे, सुनिता ढेंबरे, रूपाली जमदाडे, वंदना लोकरे आणि होमगार्ड जवान महुडे व थोरात यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलिसांनी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहनही यावेळी केले.




