दौंडमध्ये राजकीय भूकंप: जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द
🔥MK NEWS36
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
दौंड(प्रतिनिधी प्रकाश सोनवणे):
जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर दौंड नगरपरिषदेतील ‘नागरीक हित संरक्षण मंडळा’चे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी (दि. ४) याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले. या कारवाईमुळे प्रभाग क्रमांक ४ ‘अ’ मधील नागरिकांचा मागास वर्ग (OBC) प्रवर्गासाठी राखीव असलेली जागा आता रिक्त झाली असून, दौंडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
🗞️काय आहे प्रकरण?
२०२५ मध्ये झालेल्या दौंड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रोहित पाटील हे प्रभाग क्रमांक ४ ‘अ’ मधून ‘नागरीक हित संरक्षण मंडळा’च्या तिकिटावर निवडून आले होते. ही जागा मागास प्रवर्गासाठी राखीव होती. निवडणुकीदरम्यान पाटील यांनी सादर केलेले ‘कुणबी’ (इतर मागास वर्ग) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांनी तपासणीअंती अवैध ठरवले.
जात पडताळणी समितीच्या या निर्णयानंतर दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नियमानुसार नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपवला होता.
📍जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आणि पुढील प्रक्रिया
मुख्याधिकाऱ्यांच्या अहवालाची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द करत असल्याचा आदेश दिला. तसेच प्रभाग ४ ‘अ’ ची जागा रिक्त झाल्याचे घोषित केले आहे. संबंधित रिक्त जागेबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली असून, आता या जागेसाठी पुढील निवडणूक प्रक्रिया काय असणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
💢न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार : रोहित पाटील
दरम्यान, या कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना रोहित पाटील यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून, आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.




