“अवैध धंद्यांना आश्रय नाही बारामती शहर पोलिसांची दारूविक्रीविरोधात धडक मोहीम”
🔥MK NEWS36
अवैध दारूविक्रीविरोधात बारामती शहर पोलिसांची सलग दोन दिवस धडक कारवाई
बारामती : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून, सलग दोन दिवस गावठी व देशी दारू विक्रीविरोधात पोलिसांनी स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत दोन ठिकाणांहून दारूसाठा जप्त करून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी बारामती-इंदापूर रोडवरील बांदलवाडी येथे बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह छापा टाकला. यावेळी लक्ष्मण बापू जोशी (वय ६५, रा. बांदलवाडी) याच्या ताब्यातून ‘टँगो पंच’ नावाच्या ९० मिली क्षमतेच्या १८ सिलबंद देशी दारूच्या बाटल्या, एकूण किंमत ७२० रुपये, जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्पूर्वी दि. १८ सप्टेंबर रोजी जळोची गावच्या हद्दीत बैलबाजाराच्या कडेला पत्र्याच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत रंजना सोमनाथ कुदळे (वय ४५, रा. जळोची, बारामती) हिच्या ताब्यातून पांढऱ्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये अंदाजे १० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, किंमत सुमारे १ हजार रुपये, जप्त करण्यात आली. या प्रकरणीही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.
💢अवैध धंद्यांची माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
गावठी दारू, दारू गुत्ते, बेकायदेशीर ताडी विक्री, मटका-जुगार, अमली पदार्थांची विक्री, भेसळ, काळाबाजार तसेच शाळा-महाविद्यालय परिसरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा छेडछाडीचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
नागरिकांनी डायल ११२, बारामती शहर पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. माहिती देताना स्वतःची सुरक्षितता धोक्यात घालू नये तसेच संबंधित व्यक्तींशी थेट वाद घालू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख शक्य तितकी गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, विश्वासार्ह माहिती, पेट्रोलिंग आणि तपास पथकाच्या माध्यमातून समाजविघातक कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बारामती शहर पोलिसांनी सांगितले.




