ई-पेपरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

बारामतीत शौचालयाचा स्फोट; अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी..!


🔥MK NEWS36 

बारामतीत सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..!

प्रदीप गायकवाड (संपादक MK NEWS36)

बारामती : साठे नगर परिसरातील बारामती नगरपरिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजय माणिक रणदिवे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस निरीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

ही घटना सोमवार, दिनांक 23 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. सार्वजनिक शौचालयाच्या मैला टाकीत साचलेल्या गॅसमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत शौर्य सचिन गायकवाड, जय अजय खरात, आर्यन अजय खरात आणि नम्रता अनिल पाटोळे हे जखमी झाले आहेत.

तक्रारीनुसार, संबंधित शौचालयाच्या सेफ्टी टँकची वेळोवेळी दुरुस्ती व तपासणी करणे आवश्यक होते. यासाठी आरोग्य निरीक्षकांनी दुरुस्तीचा अहवाल सादर करणे तसेच तत्काळ कारवाई करणे बंधनकारक होते. तसेच आरोग्य विभाग प्रमुखांनी हा अहवाल मुख्य अधिकाऱ्यांना सादर करणे अपेक्षित होते. मात्र, या संदर्भात कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, संबंधित कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुख्य अधिकाऱ्यांची असताना त्यांनीही या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच सेफ्टी टँकमध्ये गॅस साचून हा अपघात घडल्याचा आरोप रणदिवे यांनी केला आहे.

त्यानुसार, १) मुख्य अधिकारी, बारामती नगरपरिषद, २) आरोग्य विभाग प्रमुख आणि ३) आरोग्य निरीक्षक यांच्यावर सखोल चौकशी करून भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.


Translate »
error: Content is protected !!