ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जनसुरक्षा कायद्याविरोधात दौंडमध्ये महाविकास आघाडीचा जोरदार निषेध..!


🔥MK NEWS 36 

जनसुरक्षा कायद्याविरोधात दौंडमध्ये महाविकास आघाडीचा निषेध आंदोलन

कोमल सोनवणे
प्रतिनिधी दौंड

दौंड – केंद्र सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या कायद्यामुळे सामान्य नागरिकांचे हक्क आणि लोकशाही धोक्यात येणार असल्याचा आरोप करत दौंड शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान स्तंभ येथे एकत्र येऊन आंदोलन केले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे सुनील तात्या सोनवणे, आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव, काँग्रेसचे हरेश ओझा, प्रकाश सोनवणे, संजय पठारे, अतुल थोरात, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिन गायकवाड, मंगेश गायकवाड, श्रेयस सोनवणे, ऍड. असिफ शेख, मनीषा सोनवणे, ज्योती धर्माधिकारी आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

भीतीचे वातावरण :

विरोधक व सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, या कायद्याचा गैरवापर करून सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना, विद्यार्थी संघटनांना तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही केली जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

घोषणाबाजीने दुमदुमला दौंड :

१० सप्टेंबर रोजी संविधान स्तंभ, दौंड येथे सकाळी १०:३० वाजता घेण्यात आलेल्या या निषेध आंदोलनावेळी “वोट चोर गद्दी छोड” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधींना निवेदन देत निषेध नोंदवला.

हिटलरशाही कायदा’ – आघाडीचा आरोप :

या कायद्यामुळे भारतातील लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येणार असल्याचे वक्ते म्हणाले. “हा कायदा हिटलरशाहीसारखा आहे, लोकशाही दडपण्याचा प्रयत्न आहे. सरकार सामान्य जनतेचा आवाज दाबत असून, यामुळे लोकांचे मुस्कान हिरावले जाणार आहे,” असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

पुढील रणनीती :

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, या कायद्याविरोधात राज्यभर जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांना या कायद्याचे दुष्परिणाम समजावून सांगत मोठ्या प्रमाणावर लोकचळवळ उभी करण्यात येईल.


Translate »
error: Content is protected !!