ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी उद्यापासून बारामती नगरपरिषदेसमोर ‘जनशक्ती’चे आमरण उपोषण!


🔥 MK NEWS36 

कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी उद्यापासून बारामती नगरपरिषदेसमोर ‘जनशक्ती’चे आमरण उपोषण

बारामती, दि. २२ जून:

बारामती नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि हक्काच्या लढ्यासाठी ‘जनशक्ती कंत्राटी कामगार संघटना’ उद्यापासून (२३ जून) रणांगणात उतरणार आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांतील कंत्राटी कामगारांना साप्ताहिक सुट्ट्या, पी.एफ. (PF) आणि इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी उद्या सकाळी ११:०० वाजल्यापासून बारामती नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.

या संदर्भातील मागण्यांचे सविस्तर निवेदन जनशक्ती कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष सचिन सातव यांना देण्यात आले आहे.

नगराध्यक्षांनी दिलेले तोंडी आश्वासन पाळावे!

निवेदनात नमूद केल्यानुसार, नगराध्यक्ष सचिन सातव यांनी आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांना साप्ताहिक सुट्टी व पी.एफ. लागू करण्याचे, तसेच एप्रिल व मे महिन्यातील साप्ताहिक सुट्ट्यांचे वेतन देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.

कामगारांच्या प्रमुख मागण्या:

वेळेवर पगार: बारामती नगरपरिषदेच्या सर्व विभागांतील कंत्राटी कामगारांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत करण्यात यावे, असे आदेश संबंधित ठेकेदारांना देण्यात यावेत.

सुरक्षा साहित्य व आरोग्य: कामगारांना काम करताना अत्यंत आवश्यक असणारे सुरक्षा साहित्य (उदा. हँडग्लोव्हज, मास्क, बुट, रेनकोट इत्यादी) पुरवण्यात यावे. तसेच कामगारांची नियमित आरोग्य तपासणी केली जावी.

आर्थिक व सामाजिक सुरक्षा: सर्व कामगारांना बोनस, अधिकृत ओळखपत्र आणि ईएसआयसी (ESIC) कार्ड त्वरित देण्यात यावे.

वाहनांची दुरुस्ती: बा.न.प.च्या विविध विभागांमध्ये कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित दुरुस्ती करण्यात यावी.

संघटना लढ्यासाठी सज्ज..

कंत्राटी कामगारांच्या या न्याय्य मागण्यांवर नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा हा लढा तीव्र केला जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

हे निवेदन देताना व बैठकी प्रसंगी बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, संघटक बाप्पा तोरणे, सह संघटक ओम शिंदे, सरचिटणीस सुरज वाडेकर उपस्थित होते.

तसेच महिला आघाडीच्या बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात, उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, संघटक अलका बगाडे, सरचिटणीस अनिता पवार, सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, सहसंघटक सुमन अहिवळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य विजय म्हस्के, संतोष भट, स्वप्निल लोंढे, राहुल सोनवणे, विकास माने, शंकर शिंदे, प्रशांत शेलार, नवनाथ धोत्रे व मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!