ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“बारामतीचे नगरसेवक ‘मिस्टर इंडिया’ झाले का?; नागरिकांच्या समस्या वाऱ्यावर”


🔥MK NEWS36 

“दादांचा धाक संपला… बारामती नगरपरिषद ‘मिस्टर इंडिया’च्या भरोशावर?”

बारामती : एकेकाळी शिस्त, स्वच्छता आणि काटेकोर कामकाजासाठी राज्यभरात आदर्श मानली जाणारी बारामती नगरपरिषद आज अक्षरशः ढासळल्याचे चित्र समोर येत आहे. उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या काळात अधिकाऱ्यांवर असलेला धाक, नगरसेवकांवरची करडी नजर आणि कामातील शिस्त आता पूर्णपणे गायब झाल्याची नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे.

देशमुख चौक ते सातव चौक दरम्यानच्या रिंग रोडवर सकाळी साडेसात-आठ वाजेपर्यंत पथदिवे सुरू असल्याचे प्रकार रोजच पाहायला मिळत आहेत. एका बाजूला वीज बचतीचे फक्त कागदी धोरण, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात उघड उघड वीज वाया घालवण्याचे प्रकार – यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

विशेष म्हणजे, दर गुरुवारी बारामतीत चार ते पाच तास लोडशेडिंग हा जणू नित्यक्रमच बनला आहे. नागरिक अंधारात बसत असताना, दिवसा सुरू असलेले पथदिवे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस असल्याची भावना व्यक्त होत आहे.

निवडणुकीत मोठमोठ्या घोषणा करणारे नगरसेवक आज पूर्णपणे गायब झाल्याची टीका नागरिक करत आहेत. “जनतेसाठी काम करू” म्हणणारे अनेक जण आता ‘मिस्टर इंडिया’ झाल्याचा टोला स्थानिकांनी लगावला आहे. ना प्रशासनावर नियंत्रण, ना अधिकाऱ्यांवर वचक – परिणामी मनमानी कारभाराला ऊत आल्याचे चित्र आहे.

प्रश्न उपस्थित होतो – या सगळ्याला जबाबदार कोण? निष्क्रिय प्रशासन, बेफिकीर नगरसेवक की निवडून देणारी जनता? “दादांचा धाक नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली का?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.

बारामतीची ओळख असलेली शिस्त आणि दर्जेदार कामकाज आता केवळ आठवणीत उरली असून, सध्याची परिस्थिती पाहता नगरपरिषदेच्या कारभारावर कठोर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा “आदर्श बारामती” ही ओळख इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


Translate »
error: Content is protected !!