दौंडच्या राजकारणात मोठी खळबळ; भाजप नगरसेवक रोहित पाटील यांचे जात प्रमाणपत्र अवैध, पद जाणार!
🔥MK NEWS36
दौंडच्या राजकारणात खळबळ: भाजप पुरस्कृत नगरसेवक रोहित पाटील यांचे जात प्रमाणपत्र अवैध; नगरसेवक पद धोक्यात!
प्रतिनिधी, दौंड (प्रकाश सोनवणे):
दौंड नगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजप आणि नागरी हित संरक्षण मंडळाचे प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवक रोहित पाटील यांचे ‘कुणबी’ (इतर मागास प्रवर्ग – OBC) जातीचे प्रमाणपत्र जात वैधता पडताळणी समितीने रद्द केले आहे. निर्धारित सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असताना, समितीने त्यांचा जातीचा दावा अमान्य केल्याने आता रोहित पाटील यांचे नगरसेवक पद रद्द होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. यामुळे भाजप आणि नागरी हित संरक्षण मंडळाला राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसला आहे.
📍जात पडताळणी समितीचा मोठा निर्णय
निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे नगरसेवक रोहित पाटील यांना बंधनकारक होते. त्या अनुषंगाने त्यांनी जातपडताळणी समितीपुढे अर्ज दाखल केला होता. या प्रकरणावर समितीसमोर अनेक सुनावण्या झाल्या. अखेर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आज आपला अंतिम निकाल दिला.
💥काय म्हटले आहे समितीच्या आदेशात?
“जातीचा दावा वाचा क्र. २ मधील सन २०१२ च्या नियमातील, नियम १७ (११) (२) (ख) नुसार नगरसेवक रोहित पाटील यांचा कुणबी जातीचा दावा अमान्य करण्यात आला आहे. दौंडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी (SDO) दिलेले कुणबी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र (क्र. ४१९५५४७२०१६, दिनांक १२/११/२०२५) अवैध ठरवून रद्द करण्यात येत आहे.”
यासोबतच, रोहित पाटील यांनी आपले जातीचे मूळ प्रमाणपत्र तात्काळ समिती कार्यालयात जमा करावे, असे आदेश समितीचे अध्यक्ष अमोल यादव, सदस्य सचिव शिवकांत चिकुर्ते आणि सदस्य संजय दाणे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
👍’या’ पाच जणांच्या हरकती ठरल्या निर्णायक
रोहित पाटील यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्रावर संशय व्यक्त करत दौंड आणि परिसरातील पाच जणांनी समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली होती व हरकती घेतल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने:
१) रतन जाधव (दौंड)
२) adv. सुशांत वाघमारे
३) सचिन कुलथे (दौंड)
४) मृणाल ढोले पाटील (पुणे)
५) अनिकेत भागवत (पाटस)
या पाचही जणांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि पुराव्यांमुळे अखेर सत्य जनतेसमोर आले असून समितीने हे प्रमाणपत्र रद्द ठरवले.
✅भाजप आणि नागरी हित संरक्षण मंडळाला मोठा फटका..
या निकालामुळे दौंड नगरपालिकेत भाजप आणि नागरी हित संरक्षण मंडळाचे संख्याबळ आता एकाने कमी होणार आहे. स्वीकृत नगरसेवक राजू बारवकर यांच्या प्रकरणामुळे भाजप आणि नागरी हित संरक्षण मंडळ आधीच अडचणीत सापडले असताना, आता प्रभाग ४ चे नगरसेवक रोहित पाटील यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे. एकामागून एक येणाऱ्या या राजकीय संकटांमुळे दौंडमधील सत्ताधारी गटाची डोकेदुखी कमालीची वाढली असून, विरोधी गोटात मात्र या निकालामुळे जोरदार चर्चा रंगू लागली आहे. नगरसेवक पद रद्द होण्याच्या या कारवाईमुळे दौंडच्या स्थानिक राजकारणाला आता कोणती नवीन कलाटणी मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




