“दोघांच्या भांडणात तिसऱ्याला शाप? बारामतीच्या सत्ताकारणावर नागरिकांचा सवाल”
🔥MK NEWS36
“वर्चस्वाची लढाई की पक्षसंघटना कमकुवत? बारामतीत कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर”
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36 )
✍🏻संपादकीय लेख..
बारामती : राजकारणाची पंढरी की कुरघोडीचं मैदान?
देशाच्या राजकारणात “राजकारणाची पंढरी” म्हणून ओळखली जाणारी बारामती…
पवार कुटुंबाचं वर्चस्व, सत्ता आणि रणनीती यांचं केंद्र मानली जाणारी हीच बारामती आज पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कारण आहे—सभापती व समित्यांच्या वाटपातून उघड झालेलं गटबाजीचं राजकारण.
अलीकडेच बारामती नगरपरिषद सर्व सभापती व विविध समित्या जाहीर करण्यात आल्या. ज्यांना संधी मिळाली, त्यांचं मनापासून अभिनंदन. मात्र या यादीकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—
ही यादी कार्यक्षमतेपेक्षा गटतट आणि गटांची बेरीज-वजाबाकी पाहून तयार झाली आहे का?
विशेष म्हणजे, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांचे विद्यमान शहराध्यक्ष यांना एकाही सभापतीपदात किंवा समितीत स्थान देण्यात आलेलं नाही.
हा योगायोग आहे की जाणीवपूर्वक केलेली राजकीय कुरघोडी?
हा प्रश्न आज बारामतीतील राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरतो आहे.
एक काळ असा होता की हेच शहराध्यक्ष गावचे सरपंच होते, पक्षाचे शहराध्यक्ष होते—महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली.
आणि आज?
त्यांना नवीन नगरसेवक असल्यासारखं डावललं गेलं का?
“दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ” ही जुनी म्हण बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खरी ठरत आहे का?
की “दोघांनी मिळून तिसऱ्याला शाप” या पद्धतीचं राजकारण इथे सुरू आहे?
याच सभापती व समित्यांच्या यादीत काही नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवकांना भरघोस संधी मिळाल्या.
मग प्रश्न असा पडतो की—
ही निवड गुणवत्तेवर आधारित होती का ‘माझ्या मर्जीतले’ या निकषावर?
तिकीट वाटपाच्या वेळीही अशीच चर्चा झाली होती.
काही गट आपल्या मर्जीतील लोकांना तिकीट मिळवून देण्यात यशस्वी झाले, तर काही गट अपयशी ठरले.
पक्षाने खरोखरच चांगला उमेदवार शोधला का, की गटाच्या गणितात “वाघ” हातातून निसटला?
आणि जर असे सक्षम कार्यकर्ते किंवा नेते नाराज होऊन दुसऱ्या पक्षाची वाट धरत असतील, तर यातून पक्षाचा फायदा होणार आहे की तोटा?
हा प्रश्नही आता नागरिक विचारू लागले आहेत.
आज जर शहराध्यक्षालाच डावललं जात असेल,
तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी बारामतीत संधी आहे का?
की इथेही सूत्र एकच—
माझ्या मर्जीतले तिकीट,
माझ्या मर्जीतले स्वीकृत नगरसेवक,
माझ्या मर्जीतले सभापती आणि समित्या?
येणारा काळ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल.
पण तोपर्यंत एक गोष्ट नक्की—
बारामतीत सध्या विकासापेक्षा वर्चस्वाची लढाई अधिक तीव्र झाली आहे.
कारण विचारत राहा, वाचत राहा…
कारण विचारणं तुमचा हक्क आहे
आणि तुमचे विचार मांडणं ही आमची जबाबदारी.
— MK NEWS36




