ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पळसमंडळ उपकेंद्रात आरोग्याची ‘बनवाबनवी’; गैरहजर आरोग्य सेवकाला क्लार्क आणि नर्सचे कवच का?


🔥MK NEWS36 

विशेष बातमी: आरोग्य विभागाचा ‘बनवाबनवी’चा खेळ! पळसमंडळ उपकेंद्रात रुग्णांच्या नशिबी हेलपाटे, आरोग्य सेवकाला प्रशासनाचेच अभय?

माळशिरस (सागर समिंदर प्रतिनिधी):

एकीकडे सरकार ‘आरोग्य संपन्न महाराष्ट्र’च्या घोषणा देत असताना, माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ उपकेंद्रात मात्र वेगळाच ‘मराठी चित्रपट’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या उपकेंद्रातील आरोग्य सेवक कर्तव्यावर सतत गैरहजर राहूनही नियमित पगार उचलत असून, त्याला वाचवण्यासाठी फोंडशिरस मुख्य केंद्रातील मॅडम (लिपिक) आणि उपकेंद्रातील परिचारिका (नर्स) यांनी रचलेला ‘बनवाबनवी’चा खेळ आता चव्हाट्यावर आला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, पळसमंडळ उपकेंद्रातील आरोग्य सेवक हा केवळ कागदावरच सेवा देत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात हे महाशय कर्तव्यावर नसतानाही त्यांचा पगार मात्र विनाअडथळा सुरू आहे. जेव्हा नागरिक उपकेंद्रात उपचारासाठी जातात, तेव्हा त्यांना रिकाम्या खुर्च्या आणि उडवाउडवीची उत्तरे मिळतात.

नियम फक्त जनतेसाठी? प्रशासनाची पाठराखण!

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, या गैरहजर कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी फोंडशिरस केंद्रातील काही क्लार्क आणि नर्स यांनी जणू संरक्षणाचे कवच तयार केले आहे.

रजिस्टरचा बनाव: जेव्हा सुजाण नागरिक किंवा रुग्ण आरोग्य सेवकाच्या उपस्थितीबद्दल विचारतात, तेव्हा “ते व्हिजिटला गेले आहेत” असे उत्तर दिले जाते.

माहिती देण्यास नकार: नागरिकांनी नियमावर बोट ठेवून व्हिजिट रजिस्टर किंवा उपस्थितीची नोंद मागितली, तर मात्र हेच क्लार्क आणि नर्स “नियम” पुढे करून माहिती देण्यास नकार देतात.

उडवाउडवीची उत्तरे: आरोग्य सेवक कुठे आहे? कधी येणार? या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देण्याऐवजी नागरिकांनाच प्रशासकीय नियमांचे डोस पाजले जात आहेत.

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे मौन का?

एखादा कर्मचारी सतत गैरहजर राहत असेल, तर त्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही का? की जाणीवपूर्वक या भ्रष्ट साखळीकडे डोळेझाक केली जात आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आरोग्य सेवक, क्लार्क आणि नर्स यांच्या या ‘त्रिगुटा’ला तालुका पातळीवरून कोणाचे तरी वरदहस्त असल्याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.

“आम्ही जेव्हा उपकेंद्रात जातो तेव्हा तिथे कधीच आरोग्य सेवक भेटत नाही  विचारणा केली तर नियमांची भाषा बोलली जाते. गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

— संतप्त ग्रामस्थ, पळसमंडळ.

कठोर कारवाईची मागणी..!

आरोग्य विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे पळसमंडळ परिसरातील रुग्णांना खासगी दवाखान्यांचा रस्ता धरावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या ‘बनवाबनवी’ प्रकरणाची सखोल चौकशी करून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या आरोग्य सेवकासह त्याला पाठीशी घालणाऱ्या क्लार्क आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आता पाहायचे हे की, माळशिरस आरोग्य प्रशासन यावर ‘ऍक्शन’ घेणार की ही ‘बनवाबनवी’ अशीच सुरू राहणार?


Translate »
error: Content is protected !!