‘शेतकरी योद्धा’चे संपादक योगेश नालंदे ठरले ‘शेतीमित्र’; राज्यपाल जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मान!
🔥MK NEWS36
बारामतीचे युवा पत्रकार योगेश नालंदे यांना राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ प्रदान
राज्यपाल जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत गौरव; ‘शेतकरी योद्धा’ वृत्तपत्राच्या माध्यमातून कृषी प्रसाराचे मोठे कार्य
प्रतिनिधी/मुंबई:
१ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेती क्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. यामध्ये बारामती येथील युवा पत्रकार योगेश नालंदे यांना सन २०२४ चा प्रतिष्ठित ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

मुंबई येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते योगेश नालंदे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार भरतशेट गोगावले यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
💥३६५ शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि डिजिटल क्रांती
योगेश नालंदे यांनी अवघ्या एका वर्षात तब्बल ३६५ शेतकऱ्यांच्या यशोगाथा शोधून त्यांना वृत्तपत्रांच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी दिली. या सकारात्मक यशोगाथांमुळे हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची प्रेरणा मिळाली. पत्रकारितेसोबतच त्यांनी ‘कृषी वाहिनी’वर काम करताना दैनंदिन बाजारभाव, अचूक हवामान अंदाज आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे विशेष नाट्यरूपांतर ऑडिओ (Audio) तयार करून ते रेडिओवरून प्रसारित केले.
शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल आणि प्रिंट माध्यमातून शेतीविषयक माहिती जलद गतीने पोहोचावी, यासाठी नालंदे यांनी ‘शेतकरी योद्धा’ या विशेष वृत्तपत्राची सुरुवात केली आहे. त्यांच्या याच निरंतर कृषी प्रसाराच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना ‘शेतीमित्र’ म्हणून गौरविले आहे.
💢शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे: मुख्यमंत्री
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.
“महाराष्ट्र शासन राज्यातील बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. भविष्यातही शेतकरी कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी काम करत राहील,” अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
युवा पत्रकार योगेश नालंदे यांना हा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




