ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“कामगारांचा घाम, पगारासाठी संघर्ष! बारामती नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गंभीर सवाल”


🔥MK NEWS36 

बारामतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी संघर्ष; तीन-तीन महिने वेतन रखडल्याचा आरोप

बारामती | प्रतिनिधी : बारामती शहरातील कंत्राटी कामगारांना वेळेत वेतन मिळत नसल्याचा गंभीर प्रश्न समोर आला असून, काही कामगारांचे तीन-तीन महिने वेतन रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कंत्राटी कामगारांची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत बारामती नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिन्याच्या सात तारखेपर्यंत कामगारांना वेतन मिळणे अपेक्षित असतानाही अनेक कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नसल्याचे कामगारांनी सांगितले. काही विभागांमध्ये तीन-तीन महिने काम करूनही वेतन मिळाले नसल्याची माहिती बैठकीत समोर आली.

ठेकेदारांकडून ‘नगरपालिकेने आमचे बिल अदा केलेले नाही’ असे कारण देण्यात येत असल्याचे कामगारांनी सांगितले. मात्र, नगरपरिषदेकडून ठेकेदाराचे बिल अदा करण्यास विलंब झाला तरी कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

नगरपरिषद प्रशासनाकडून ठेकेदारांची बिले वेळेत अदा होत नसतील, तर त्यामागील कारणांचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. बिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्या तातडीने दूर करून संबंधित ठेकेदारांची देयके अदा करावीत, अशी मागणी करण्यात आली.

नगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील आर्थिक व्यवहारांचा फटका मात्र कंत्राटी कामगारांना बसत असून, वेतन रखडल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.

“कंत्राटी कामगारांनी प्रामाणिकपणे काम करूनही आपल्या हक्काच्या पगारासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही मोठी शोकांतिका आहे. कामगारांना वेळेत वेतन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासन आणि ठेकेदारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी,” अशी मागणी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी केली.

कंत्राटी कामगारांना वेळेत वेतन मिळावे, या मागणीसाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच नगरसेवकांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

या बैठकीस बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सुरज वाडेकर, शहर महिला अध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे, सदस्य स्वप्निल लोंढे, राहुल सोनवणे, शंकर शिंदे, प्रशांत शेलार, नाना बगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!