ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

नऊ वर्षांनंतर नगरपरिषदेची प्रक्रिया वेगात; महिला नेतृत्वाची नवी पिढी सज्ज..!


🔥MK NEWS 36 

दौंड नगरपरिषदेचा बिगुल वाजला – ओबीसी महिला आरक्षण जाहीर, दिग्गज नेत्यांमध्ये निराशेचे वातावरण

प्रतिनिधी : कोमल सोनवणे, दौंड

दौंड – दीर्घकाळ रखडलेले दौंड नगरपरिषदेचे आरक्षण अखेर दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर झाले असून, यामध्ये ओबीसी (महिला) या वर्गासाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेनंतर दौंडच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

नऊ वर्षांपासून स्थगित असलेली नगरपरिषदेची प्रक्रिया आता वेगाने सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याची स्वप्ने पाहणारे काही दिग्गज नेते या आरक्षणामुळे निराश झालेले दिसत आहेत. “गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या” या नेत्यांच्या योजना कोलमडल्याने राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय वारसा लाभलेल्या दौंड शहरात विविध समाजघटक एकत्र नांदतात. अशा परिस्थितीत कोणती ओबीसी महिला उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभी राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही नेतेगटांमधून आरक्षणाबाबत हरकती नोंदवण्याची हालचाल सुरू असून, “पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती देणार आहोत” अशी माहिती दबक्या आवाजात दिली जात आहे.

दरम्यान, नागरिकांशी संवाद साधताना अनेकांनी सांगितले की, “दौंड शहराचा खरा विकास जो करेल, त्यालाच आम्ही मतदान करू. आजवर फारसा विकास झाला नाही, यावेळी बदल हवा आहे.”

आगामी निवडणुकीत मतदारराजा कोणत्या ओबीसी महिला उमेदवारावर विश्वास ठेवतो, आणि नगरपरिषदेचा कारभार कोणाच्या हाती देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दौंडच्या राजकारणात आता नव्या युगाची सुरुवात झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.


Translate »
error: Content is protected !!